पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारनं आता वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा झाल्यापासाून पार्थ पवार सातत्यानं प्रचार करताना दिसत आहेत.
मध्यंतरी पार्थ पवार प्रचारातून गायब झाले होते. त्यावरसुद्धा अजित पवार यांनी ते गनिमी काव्यानं प्रचार करीत असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला होता. तसेच कार्यकर्त्यांना फोन करून धमकावलं जात असल्याचंही म्हटलं होतं.
काय असते वाय प्लस सुरक्षा? अतिमहत्त्वाच्या आणि जीवाला धोका असणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून वाय प्लस सुरक्षा पुरविली जाते. वाय प्लस सुरक्षेत ११ जवानांचा समावेश असतो. त्यात दोन ते चार सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ कमांडो आणि पोलिसांचा समावेश असतो. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून सुरक्षा पुरविण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेत वेळोवेळी बदल करण्यात येतात.



