
भाजपाने लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापलेले आहे. उत्तर प्रदेशमधील कैसरगंजचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह, मुंबई उत्तर मध्य लोकसभेच्या खासदार पूनम महाजन आणि लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनाही भाजपाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या तिघांचेही तिकीट कापले जाणार का? असा प्रश्न पडला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या तिघांच्या उमेदवारीबाबत भाजपामधील सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे. त्यात या तिघांचे तिकीट कापले गेले तर त्यामागे काय कारणे असू शकतात? याची चर्चा करण्यात आली आहे.
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजभूषण सिंह यांच्या पत्नी केतकी देवी सिंह यांना त्यांच्याजागी उमेदवारी दिली जाऊ शकते. केतकी देवी सिंह यांनी १९९६ ते ९८ या दोन वर्षांसाठी गोंडा लोकसभेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र ब्रिजभूषण सिंह यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही, त्यामुळे उमेदवारीचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.


