अमरावती : आज आम्ही सगळे अमरावतीत थापाड्यांची खोटारड्यांची लंका जाण्यासाठी एकत्रित आलो आहोत. आजवर यांची खूप थेरं पाहिलीत. हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे मी अभिमानाने सांगतो. पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला असताना यावेळी यशोमती ठाकूर यांनी त्यांचा बंदोबस्त आम्हीच करतो असे मला सांगितले. 80 कोटी जनतेला आम्ही मोफत रेशन दिलं अशी भाषा सध्या जिकडे-तिकडे केली जात आहे.
आपल्या देशातील नागरिकांना फुकटच्या रेशनची गरज नाही तर रोजगाराची गरज आहे. रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा जिकडे-तिकडे मोदी सरकार मोदी सरकार अशा घोषणा देतात. स्वतः नरेंद्र मोदी हे देखील मोदी सरकार असा उल्लेख करतात. केवळ देशाला लुटणारे हे मोदी सरकार आम्हाला नको तर आम्हाला आमचे भारत सरकार हवे असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. हुकूमशाहीला गाडून टाका : सध्या देशात हुकूमशाही सारखे वातावरण आहे.
आमच्या महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातमध्ये पळविण्यात आले आहे. अमरावतीच्या खासदारांनी महाराष्ट्रातील उद्योग बंद पाडून गुजरातमध्ये नेले जात असल्या संदर्भात कधीही या सरकारला प्रश्न विचारला नाही. या देशात एका धर्मात प्रचंड मुलं जन्माला येत आहेत आणि आपल्या धर्मात मूल जन्माला येण्याचे प्रमाण कमी झाले, असे नरेंद्र मोदी म्हणतात. आता कुठे किती मुलं जन्माला येत आहेत आणि कुठे येत नाहीत हे नरेंद्र मोदी यांनाच चांगल्या प्रकारे ठाऊक असेल. जाती धर्मात तेढ निर्माण करून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा यांचा डाव आहे. त्यांना या देशात हुकूमशाही हवी असून आमच्या कट्टर शिवसैनिकांनी त्यांची हुकूमशाही गाडून टाकावी, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

