
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातला होता. यावरुन राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घालण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचं म्हणत शरद पवार गटाने टीका केली आहे.
शरद पवार गटाच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरुन यासदंर्भात पोस्ट करण्यात आली आहे. यात म्हणण्यात आलंय की,’जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे.
“प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचा जिरेटोप घालून सत्कार करणे त्यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. हिंदू महासभेने देखील यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी यावरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. इतकी लाचारी कुठून आली. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर बसवणार का? असा सवाल दवे यांनी केला आहे.
