कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ढाण्या वाघ अशी प्रतिमा असलेले, काँग्रेसशी अतूट निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल केलेले आणि सामान्य कार्यंकर्त्याचा आधारवड बनलेले नेते आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी. एन. पाटील (वय ७१ रा. मुळ गांव सडोली खालसा, ता.करवीर सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर) यांचे गुरुवारी सकाळी सहा वाजता मेंदूत रक्तस्त्राव होवून आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दू:खाचा डोंगरच कोसळला. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहूल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे.
त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते.
लोकसभा निवडणूकीत तब्बल महिनाभर त्यांनी प्रचारासाठी रात्रीचा दिवस केला. त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. म्हणून आवश्यक सर्व तपासण्या करूनही घेतल्या. त्यामध्ये कांहीच दोष न आढळल्याने ते थोडे निवांत झाले. तसेही शनिवारीच घरी जावून शाहू छत्रपती यांनी त्यांना तुम्ही आजारपण अंगावर काढू नका, तातडीने रुग्णालयात दाखल व्हा असा आग्रह धरला होता. परंतू आता बरे वाटते आज/ उद्या जातो दवाखान्यात असे त्यांचे मत पडले. नियतीने तेवढाच डाव साधला आणि रविवारी सकाळी ब्रश करताना ते कोसळले. तेथूनच त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.



