सांगली : शिवसेनेच्या कोल्हापूर, हातकणंगले या जागा शाहू महाराज व राजू शेट्टी यांना देणार असल्याने त्यांनी त्यांचा उमेदवार परस्पर जाहीर केला, असा खुलासा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांचा नामोल्लेख टाळत इस्लामपूर येथे केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील,सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंग नाईक, युवानेते प्रतीक पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विजयराव पाटील, शहाजी पाटील, देवराज पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, शकील सय्यद, काँग्रेसचे राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, “हा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्याची शिफारस आम्ही केली होती. ते उध्दवजी ठाकरे यांना दोनदा भेटूनही आले होते. मात्र त्यानंतर चित्र वेगळे झाले. आम्ही सत्यजित पाटील यांच्या नावाची शिफारस केली. उध्दव ठाकरे यांनी त्यांना बोलावून त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आमदार बंटी पाटील यांच्याकडे आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त करून पत्राचा मसुदाही दिला. मात्र त्यानंतर उध्दवजी ठाकरे यांनी आपला निर्णय कायम ठेवला. सांगली मतदारसंघात सध्याचे जे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्या नावाची मी शिफारस केली होती.
प्रतीक यांच्या प्रचारयंत्रणेचे कौतुक
आमदार जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात १०४ सभा घेतल्या. प्रतीक पाटील यांनी शिलेदारांना सोबत घेऊन इस्लामपूर मतदारसंघ पिंजून काढला. संपूर्ण प्रचार यंत्रणा हाताळली. याबाबत सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात त्याबाबत कौतुक केले.



