ठाणे: डोंबिवली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातीत मृतांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. या अपघातात ६४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवलीच्या औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) फेज-२ मध्ये असलेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की कंपनीच्या परिसरातील अने कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला. बॉयलरमधील स्फोटाचा आवाज सुमारे पाच किलोमीटरपर्यंतच्या परिसरात ऐकू आला. तर दोन किलोमीटरच्या परिसरात त्याचे हादरे बसले. अनेक इमारतीच्या काचा फुटल्या. या घटनेत स्थानिकही जखमी झाले आहेत. जेव्हा हा बॉयलर फुटला तेव्हाचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. हे व्हिडिओ अत्यंत भयंकर असून काळजाचा ठोका चुकवणारे आहेत.
कारखान्याच्या आवारात आणखी काही जणांचे मृतदेह असू शकतात. सध्या ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची भीती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी व्यक्त केली. या अपघातात ६४ जण जखमी झाले असून त्यात अनेक महिलांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितले. जखमींवर सहा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दोन डझनहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.


