महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान पार पडलेले आहे.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसने स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी यावरून काँग्रेसला इशारा दिला होता. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर खोचक शब्दात टीका केली आहे. “आमची भूमिका मान्य केली असती तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

 

संजय शिरसाट काय म्हणाले?

 

“सांगलीच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली ती वस्तुस्थिती होती. अनेक ठिकाणी आम्ही सांगायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्याबरोबर राहणार नाही. आता त्याचा अनुभव त्यांना सांगलीत आला. त्यांच्या सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की, काँग्रेसने आम्हाला धोका दिला, त्याला सपोर्ट करायला राष्ट्रवादी होती. यापुढे आम्ही त्या पक्षाला विधानसभेची पायरी चढू देणार नाही, भलेही आमच्या पक्षाने कारवाई केली तरी, असं ते जिल्हाप्रमुख म्हणाले. अशीच भूमिका आमचीही होती. आमच्या त्या भूमिकेला सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी पुष्टी केली”, असं संजय शिरसाट म्हणाले.