![Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा, अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात Vidhan Parishad Election 2024 Shivsena Thackeray Camp announce candidates Anil Parab and J M Abhyankar for graduate and teachers constituency election Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा, अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/04128f5c605e16adfa771835f07af1941716602617972954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: 26 जून रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.
ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)