लोकसभा निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीवरुन सध्या चांगलाच गदारोळ सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाची (Voting) टक्केवारी व आकडेवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयुक्तांकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, आज लोकसभा निवडणुकांच्या 6 व्या टप्प्यात 58 जागांवर मतदान घेण्यात येत आहे. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आत्तापर्यंतच्या मतदानाची टक्केवारी अखेर जाहीर केली आहे. गेल्या 5 टप्प्यात देशात झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले, याची इतंभू माहितीच आयोगाने दिली आहे. तसेच, मतदान टक्केवारीवरुन काही चुकीचे गैरसमज पसरवले जात असल्याचंही आयोगाने म्हटले आहे.
आयोगाने 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी, तर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती. त्यात प्रारंभीची टक्केवारी व अंतिम टक्केवारीमध्ये 5.75 टक्क्यांची तफावत आढळून आली. त्यामुळे, आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स व कॉमन कॉज यांनी संयुक्तपणे, तसेच मोहुआ मोईत्रा यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर, आता निवडणूक आयोगानेच पहिल्या 5 टप्प्यातील मतदानाची संपूर्ण आकडेवारी जारी केली आहे.
निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत झालेल्या सर्वच मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जारी केली. तसेच, निवडणूक प्रक्रियेला खराब करण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक चुकीचा समज पसरवला जात आहे. आयोगाच्या अॅपवर सकाळी 9.30 वाजल्यापासून मतदानाची टक्केवारी अपडेट होत असते, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच, आयोगाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून मतदान टक्केवारीत कुठलाही बदल झाला नसल्याचेही सांगितले.
निवडणूक आयोगाकडून जारी केलेली टक्केवारी
पहिला टप्पा – 66.14 टक्के
दुसरी टप्पा – 66.71 टक्के
तिसरा टप्पा – 65.68 टक्के
चौथा टप्पा – 69.16 टक्के
पाचवा टप्पा – 62.20 टक्के