मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. शरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख असलेल्या दुहान यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीला मागच्या दाराने हजेरी लावल्याने त्या ‘तुतारी’ खाली ठेवत पुन्हा ‘घड्याळ’ बांधणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु मी पक्ष सोडलेला नाही, किंवा कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सोनिया दुहान यांनी माध्यमांसमोर येऊन दिलं. लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या तोंडावर उडालेल्या चर्चांच्या धुरळ्याने खळबळ उडाली होती.
सोनिया दुहान काय म्हणाल्या?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कुठलाही पक्ष सोडलेला नाही, किंवा कुठल्याही पक्षात, मग तो अजित पवार यांचा पक्ष असू दे किंवा इतर कुठलाही पक्ष असेल, त्यात प्रवेश केलेला नाही. राहता राहिला प्रश्न मला बैठकीच्या ठिकाणी पाहिलं गेल्याचा, तसं तर सुप्रिया ताईही पक्ष फुटीवेळी अजित पवारांच्या घरी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत दिसल्या होत्या, मग त्यांनी अजित पवारांचा पक्ष जॉईन केला का? मी कुठलाही पक्ष प्रवेश केलेला नाही, किंवा शरद पवारांची साथ सोडलेली नाही. या क्षणापर्यंत मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं.



