सांंगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापुर्वीच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून जिल्ह्यात जागेसाठी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्येच अधिक घमासान पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. जागा कमी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जागा वाटपानंतर संभाव्य बंडखोरी टाळण्यात पक्ष नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. विशेषत: जत, खानापूर-आटपाडी अधिक पाहण्यास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अजून अवधी असला तरी स्थानिक पातळीवरून आतापासूनच विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे तीन, भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक असे पक्षिय बलाबल सध्या आहे. यापैकी शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खानापूर-आटपाडीचे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जाग रिक्त आहे. भाजपने जिल्ह्यातील आठही मतदार संघ जिंकण्याच्यादृष्टीने तयारी केली असून त्यादृष्टीने चाचपणी सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले यावर विधानसभेची गणिते अवलंबून राहणार असली आणि त्यावर उमेदवार निश्चित केले जाणार असले तरी इच्छुकांना आता घाई झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडी तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत अपेक्षित धरूनच राजकीय व्यूहरचना केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्ष आपआपल्या जागा मागून घेणारच यात शंका नाही. तीच स्थिती महायुतीची राहील असे असले तरी घटक पक्षांनीही काही जागासाठी दावा केला आहे. यामध्ये जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि संस्थापक विनय कोरे यांनी जत, मिरज व सांगली या तीन मतदार संघावर दावा केला आहे. तर खानापूर-आटपाडी हा स्व. आमदार बाबर यांचा पारंपारिक मतदार संघ असल्याने शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आग्रही राहील असे दिसते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे उमेदवारीसाठी आग्रही राहणार हे स्पष्ट असले तरी या मतदार संघात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हेही आग्रही आहेत. यामुळे विधानसभेसाठी महाआघाडीपेक्षा महायुतीमध्येच जागा वाटपाचा पेच तीव्र असेल असे प्रथम दर्शनी दिसत आहे.



