महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत आणि त्यातही मुंबईत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंगावर घेत आक्रमकपणे निवडणूक लढविणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकण, ठाण्याच्या भूमीने मात्र यंदा बुचकळ्यात टाकले आहे. कोकणी मतदार हा अनेक दशकांपासून शिवसेनेची ताकद मानला जातो. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे बिरूदही एकसंध शिवसेनेला अनेक वर्ष चिकटले होते. त्यामुळे कोकण-ठाण्याच्या सहा जागांवर चांगले यश मिळेल अशी अपेक्षा उद्धव सेनेचे चाणाक्य बाळगून होते.
ठाणे हा अलिकडच्या काळात भाजप आणि नरेंद्र मोदीनिष्ठ मतदारांचा बालेकिल्ला ठरतो की काय अशी परिस्थिती आहे. असे असताना कोकण-ठाण्याच्या पाचपैकी एकाही जागेवर उद्धव सेनेला यश मिळाले नाही. भिवंडीत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला नसता तर कोकण पट्टीत महाविकास आघाडीचे खातेही उघडले नसते अशी स्थिती होती.



