
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येणं टाळलं होतं. अखेर त्या गुरुवारी (१३ जून) प्रसारमाध्यमांना सामोऱ्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीत राणा या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या. नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, मी पाच वर्षे अमरावतीकरांसाठी खूप कामं केली, तरीदेखील त्यांनी मला लोकांनी का थांबवलं? याचा विचार मी करत आहे. मी माझ्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे २०१९ मध्ये अमरावतीकरांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेत पाठवलं होतं. निवडून आल्यानंतर मी आणखी कामं केली. परंतु, यंदा मला त्यांनी का थांबवलं? हे मी समजू शकले नाही.
नवनीत राणा म्हणाल्या, “मी पराभूत होऊनही जिंकले आहे. कारण आमच्या नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मी नक्कीच हरले आहे. परंतु, नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेत होते, तेव्हा माझ्या मनात जिंकल्याचीच भावनात येत होती.”



