मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला होता. सुरुवातीला निवडणुकीचा निकाल देत असताना अमोल कीर्तीकर यांचा विजय जाहीर केल्यानंतर वायकरांच्या विनंतीनुसार पोस्टल मतांची फेर मतमोजणी करण्यात आली. या फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र या सगळ्या मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप अमोल कीर्तीकर यांनी केला.
मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले
शिवाय त्यांनी मतांची फेर मतमोजणीची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र निकालाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणी नाकारली. निकालाच्या चार दिवसानंतर निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या सूचनेनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासंदर्भात अमोल कीर्तिकर आणि पत्र दिले होते. मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ झाल्याचे सांगत 4 जून रोजी दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज कीर्तिकर यांनी मागितले होते. आता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अमोल कीर्तिकर सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे.
लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी कोर्टात जाण्याची तयारीत
सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याची बाब निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकरांसमोर आणली असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाचे नियमाचे संदर्भ देऊन सदरचे फूटेज देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या उत्तरानंतर निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाला आव्हान देण्यासाठी अमोल कीर्तीकर कोर्टात जाण्याची तयारीत आहेत. अमोल कीर्तीकर यांनी या सगळ्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिले आहे.



