मुंबई : शिखर बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं क्लीनचीट दिली होती. या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
या रिपोर्टविरोधात ज्योष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी कोर्टात याचिका दाखल केल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या होत्या. तसंच यावर राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रियाही देण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द अण्णा हजारे यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
नेमकं काय घडलंय?
शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत असल्याचा आरोप आण्णा हजारे यांनी केला आहे, ते राळेगण सिद्धी इथं बोलत होते.



