लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. मात्र, असं असलं तरी सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीपासूनच धुसफूस पाहायला मिळत आहे.

 

सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला, तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. यानंतर विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाष्य करत अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.