
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे नेते एकवटल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी नवी मुंबईत मात्र भाजप नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांमधील मनोमिलनाचे प्रयत्न नवोदित खासदार नरेश म्हस्के यांनीही सोडून दिल्याने चित्र सध्या दिसू लागले आहे. खासदार म्हणून निवडून येताच म्हस्के यांनी नवी मुंबईतील महायुतीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेतल्या. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेत असताना शिंदे सेनेचे नेते म्हस्के यांच्यासोबत आवर्जून उपस्थित होते. मात्र गणेश नाईक यांच्या खैरणे एमआयडीसी येथील दरबारात जात असताना शिंदेसेनेतील महत्वाच्या नेत्यांनी आणि प्रभावी नगरसेवकांनी म्हस्के यांची संगत केली नाही. यामुळे म्हस्के याच्या प्रयत्नानंतरही नवी मुंबईत शिंदेसेना आणि नाईकांमधील दरी कायमच असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पक्षाच्या नेत्यांनी बराच जोर लावला होता. या जागेसाठी भाजपकडून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचे नाव जवळपास पक्के मानले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र तसे होऊ दिले नाही. हा मतदारसंघ शिंदेसेनेला आणि त्यातही मुख्यमंत्री समर्थक नरेश म्हस्के यांना सोडताच नवी मुंबईतील भाजपच्या एका मोठया वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे पहायला मिळाले. गणेश नाईक यांच्या कट्टर समर्थकांनी सुरुवातीला थेट बंडाची भाषा केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर मात्र हे चित्र निवळले. कार्यकर्त्यांची नाराजी, आगरी-कोळी समाजातील अस्वस्थता, कडव्या नाईक समर्थकांकडून होणारी बंडाची भाषा यामुळे नवी मुंबईत म्हस्के यांचा टिकाव लागणार नाही असेच चित्र होते. मात्र संपूर्ण नाईक कुटुंब म्हस्के यांच्या प्रचारात उतरले आणि नरेंद्र मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागू लागले. स्वत: नरेश म्हस्के यांनी नाईक कुटुंबिय नाराज रहाणार नाहीत यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. निवडणुक निकालानंतर बेलापूर मतदारसंघात १२ हजार तर ऐरोलीत ९ हजार मतांचे मताधिक्य म्हस्के यांना मिळाले. मागील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवाराला मिळालेले हे मताधिक्य कमी असले तरी नाराजीचा हंगामातही नवी मुंबईतून राजन विचारे यांना मताधिक्य मिळाले नाही ही म्हस्के यांच्यासाठी उजवी बाजू ठरली.



