सध्या संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काही प्रमाणात हा पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस पाहायला मिळाला आहे. मात्र आता काही भागांत गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.
मात्र अशातच मुंबईकरांना मात्र पावसाने दिलासा दिला आहे. मुंबईत कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. तर मुंबईतील काही भागांत आज पहाटेपासूनच पाऊस सुरू झाल्याचे दिसत आहे. अशातच आता हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या भागांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाला सामोरे जावं लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गपासून ते थेट ठाण्यापर्यंत किनारपट्टीसाठी पुढील चार दिवस पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे. अशातच हवामान विभागानं या भागाला यलो अलर्ट देखील जारी केला आहे. तसेच, पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
या भागातील पावसाचा जोर वाढणार :
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दडी मारली होती. मात्र आता आजपासून पावसाचा जोर पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडल्याच चित्र होत. मात्र आता मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावताना दिसणार आहे. गेल्या आठवडाभरापासून मान्सूनची आगेकूच रखडली असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता हवामान विभागाने राज्यभर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.



