
नाशिक : राज्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये झाला. या वर्धापन दिन सोहळ्यातून भाषण करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. आता यावर वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे सरकारने आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सर्वत्र पैशाची मस्ती सुरू आहे. आता तर वारकऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी मते, क्रिकेटचे संघ आणि मंडळांना पैसे देऊन विकत घेतले. आता ते वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी हे या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती आहेत. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना चांदीच्या ताटात नजराना पाठवला होता. तो नजराना तुकोबारायांनी माघारी पाठवला होता, असे त्यांनी म्हटले.



