मुंबई : विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे.
आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असं असतानाही विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे.
ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित, आज महत्त्वाची बैठक
सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणं आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणं, हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. याशिवाय पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांचं प्रतिज्ञापत्र जी सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज (गुरुवारी) बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्यावतीनं या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.



