मुंबई : पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता वर्तवण्याचे येत आहे. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
समर्थकांना मोठा दिलासा
लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांचा विजय होऊन ते लोकसभेत जाणार आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या कोणत्याही एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे नाराज असणाऱ्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या. त्या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला होता. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास मुंडे समर्थकांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, यापूर्वीही महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायची. उमेदवारीच्या शर्यतीत त्याच आघाडीवर आहेत, असे सांगितले जायचे. परंतु, प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली होती. त्यामुळे आता यावेळी तरी संधी मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.



