शरद पवार ज्याअर्थी हे म्हणत आहेत की त्यांच्याकडे आमच्या गटातून लोक येऊ शकतात याचाच अर्थ त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत उमेदवार नाहीत. असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. याआधी रोहित पवार यांनी अजित पवार गटातले १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यावेळीही अजित पवार गटाने हा दावा फेटाळून लावला होता. तसाच तो आजही उमेश पाटील यांनी फेटाळून लावला. आमच्या पक्षातला एकही आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाही असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेकजण शरद पवार गटात येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य आहे? याबाबत मला सांगता येणार नाही. मात्र, आमच्या पक्षातील जे इतर माझे सहकारी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र, याबाबत स्पष्ट असं विधान करता येणार नाही. त्यामध्ये जे इकडे येण्यास इच्छुक आहेत, त्यांचं योगदान आणि भूमिका यावरून निर्णय घेतला जाईल.” असं शरद पवार म्हणाले होते.


