
राज्यात ट्रीपल इंजिनचं सरकार असल्याचं अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातं. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार येईल, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार यांना विसरले का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबन इंजिनचं सरकार येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
- नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“आमची महायुती पक्की आहे. आमचा प्रत्येक पदाधिकारी महायुती भक्कम राहील, याकरीता काम करतो आहे. त्यामुळे ११ पक्षांची महायुती अत्यंत मजबूत आहे. आम्ही अत्यंत मजबुतीने विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार राहील”, असं बावनकुळे म्हणाले.
- मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवरही केलं भाष्य
पुढे बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवरही भाष्य केलं. “मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे आणि तो लवकर व्हायला पाहिजे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विस्तार करतील. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना काय वाटतंय, यापेक्षा मुख्यमंत्र्यांना जेव्हा वाटेल, तेव्हा ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.



