
मुंबई: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला पाच, शिंदे गट 2 आणि अजितदादा गटाच्या वाट्याला विधानपरिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. या दोन जागांसाठी अजित पवार गटाने उमेदवार निश्चित केल्याची माहिती आता समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना राज्यपानियुक्त आमदारांमध्ये संधी देऊ, असे सांगण्यात आले होते.
पण मविआचे सरकार कोसळल्याने शिवाजीराव गर्जे यांची विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा अधुरी राहिली होती. परिणामी त्यांना यावेळी संधी मिळू शकते. तर राजेश विटेकर यांनी लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडण्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी विटेकर यांना, ‘विधानपरिषदेवर संधी देऊ’ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता राजेश विटेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळू शकते. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही मंगळवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या या बैठकीत विधानपरिषदेसाठी इच्छूक असलेल्या 50 जणांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली होती. यानंतर सहा जणांची नावं निश्चित करण्यात आली. यामध्ये संजय सावंत, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश होता. यापैकी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी नऊ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवर महाविकास आघाडीचे (MVA) 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. केवळ 11 व्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील उत्सुक आहेत. त्यांचे सर्वपक्षीय संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा याच सर्वपक्षीय संबंधाचा वापर करुन विधानपरिषदेवर निवडून जाऊ शकतात.
कुणाकडे किती संख्याबळ ?
महायुती
भाजप -103 शिंदे सेना – 37 राष्ट्रवादी (AP) – 39 छोटे पक्ष – 9 अपक्ष – 13 असे एकूण – 201
मविआ
काँग्रेस – 37 ठाकरे गट – 15 राष्ट्रवादी (SP) – 13 शेकाप – 1 अपक्ष – 1 असे एकूण – 67
एमआयएम – 2, सपा – 2, माकप – 1 क्रां. शे. प. – 1 एकूण – 6 आमदार तटस्थ आहेत.
विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.



