भारताचा टी-२० विश्वचषक विजेता संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचला. त्यानंतर सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. दरम्यान, जसप्रीत बुमराहने ‘एक्स’ वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी आणि पंतप्रधान मोदीं दिसत आहे. एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुमराहच्या मुलाला कडेवर घेतलेले दिसत आहे.

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या मुलाचे नाव अंगद असून त्याचा जन्म ४ सप्टेंबर २०२३ रोजी झाला होता. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पीएम मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. बुमराहने लिहिले, “आज सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आमंत्रित होणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या उत्साही क्षणांसाठी आणि पाहुणचारासाठी मोदी सरांचे खूप खूप आभार.”

याआधी नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतीय संघाची भेट घेतली, सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत फोटोशूट केले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सर्व सदस्यांशी आपुलकीने संवाद साधला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी टीम इंडिया बार्बाडोसमध्ये असतानाही त्यांनी फोनवर बोलून भारतीय खेळाडूंना दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.