मुंबई : अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प नुकताच मांडला. मात्र यामध्ये करण्यात आलेल्या घोषणांवरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाकाठी चाळीस हजार कोटी रुपयांची गरज असताना केवळ दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली याचा अर्थ तीन-चार महिन्यांसाठीच ही तात्पुरती योजना असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. निवडणुकीनंतर या योजनेचे काय होईल ठाऊक नाही, असेही ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ असेही त्यांनी जाहीर केले.
राज्य सरकारने जारी केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिशाभूल करण्यात आली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्रसरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अमंलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात अकराव्या स्थानी आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र मागे जाणे याचा अर्थ राज्याची अर्थव्यवस्था ढासळली आहे. राज्याचा विकासदर जवळपास शून्य आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.



