
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास एक लाख कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प राबवत असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) तिजोरीत मात्र खडखडाट आहे. कर्ज उभारणीनंतरही निधी अपुरा पडू लागल्याने आता बाजारात रोखे विक्री करून निधी उभारण्याची वेळ प्राधिकरणावर आली आहे. त्यानुसार ५० हजार कोटींच्या रोखे विक्रीच्या प्रस्तावाला शुक्रवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएमार्फत मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या वर्षभरात प्राधिकरणामार्फत हजारो कोटींच्या कामांची घोषणा करण्यात आली असून अनेक प्रकल्प सुरूही करण्यात आले आहेत. कधी काळी श्रीमंत प्राधिकरण अशी ओळख असलेल्या एमएमआरडीएची तिजोरी या प्रकल्पांमुळे रिकामी झाली आहे. मात्र, राजकीय दबावामुळे प्रकल्पांच्या मंजुरीचा धडाका सुरूच आहे. अशा परिस्थितीत निधी उभारायचा कसा, असा प्रश्न एमएमआरडीएला पडला आहे.


