विधानसभेची निवडणूक येत्या काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी मतदारसंघांचा आढावा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही चर्चा होत आहेत. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे.

 

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल टी-२० विश्वचषकात विजय मिळवलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या विधानभवनातील सत्कार सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. “आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करत आहोत”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे निवडणुकीत कळेल”, अशा इशारा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुंख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.