
विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते सध्या आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेत आहेत. याबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सध्या सुरु आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी १० जण इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेसला २८८ जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही”, असा मोठा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चर्चांना उधाण आलं आहे.
अनिल पाटील काय म्हणाले?
महाविकास आघाडीत धूसफुस सुरु आहे असं वाटतं का? या प्रश्वावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, “काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कमीत कमी १० जण शर्यतीत आहेत. त्यामुळे काँग्रेसला २८८ जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. ते फक्त शिवसेना ठाकरे गटाचा एक मुखवटा पुढे करण्यात येत असल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरु झाली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली वाढलेल्या आहेत”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.



