मुंबई- वरळीमधील हिट अँड रन प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार राऊत म्हणाले, “सरकारकडून आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही आरोपीच्या वडिलांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासू शकता. आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्ड टोळीशी संबंध आहे. त्यांची मालमत्ता आणि आणि फॅन्सी गाड्या याबाबतचा खुलासाही व्हायला हवा.
आरोपीनं ड्रग्ज घेतले होते. वैद्यकीय तपासणीच्या नोंदीत येऊ नये, म्हणून तीन दिवस त्याला लपविण्यात आले. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपीला पहिल्या दिवसापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय येत आहे. पोलिसांना त्याचा हिशोब द्यावा लागेल. आरोपीला सुटला तर त्याला रस्त्यावर जाब विचारावा. एका निष्पाप महिलेला वारंवार चिरडले. असा आरोपी सुटू नये. राज्यात गुन्हेगारांना पाठिशी घालणारे सरकार आहे.
मुंबईतलं हिट अँड रन प्रकरण हे गंभीर प्रकरण आहे. शाह कुटुंबाने मिहीरला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. राजेश शाह यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत हे लक्षात घ्या. त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तपासा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राजेश शाह यांच्याकडे आलेली मालमत्ता, आलिशान कार कुठून आल्या त्याची चौकशी करा. राजेश शाह मुख्यमंत्र्याचा खास माणूस कसा का? बोरीवली पोलीस ठाण्यात जाऊन पुरावे तपासा असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मिहीर शाह याने ड्रग्ज घेतले होते. रक्ताच्या नमुन्यांमध्ये ते ड्रग्ज येऊ नये म्हणून त्याला तीन दिवस गायब करण्यात आलं होतं. त्याला लपवून ठेवलं होतं. त्यानंतर त्याला अटक झाली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. एका महिलेला चिरडलं आहे. माणुसकीला काळीमा फासला जाणारा हा प्रकार आहे. असा माणूस कधीही सुटायला नको. तसंच त्याला वाचवण्याचे प्रयत्न चालले आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या राज्यातलं सरकार गुन्हेगारांना पाठिंबा देणारं सरकार आहे. अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन हे सरकार स्थापन झालं आहे. गुन्हेगारी करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून गुन्हेगारांना पक्षात आणलं आहे. वरळी हिट अँड रनमध्ये हेच झालं आहे असंही संजय राऊत म्हणाले. मिहीरच्या शरीरातील नशेचा अंमल रिपोर्टमध्ये येऊ नये म्हणून त्याला तीन दिवस फरार ठेवण्यात आलं असंही संजय राऊत म्हणाले. तसंच मुंबई पोलिसांनी या मुलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीही मागणी संजय राऊत यांनी केली.


