![]()
राज्यातील राजकारणात गेल्या दोन अडीच वर्षांत मोठी उलथापालथ झाली आहे. या उलथापालथीचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गेल्या निवडणुकीत राज्यात अव्वल स्थानी असलेली भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेऊनही आपले अव्वल स्थान टिकवू शकले नाहीत. तर अजित पवार यांनाही आपल्या पक्षाचा अवघा एकच खासदार निवडून आणता आला.
आता लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर येत्या दोन तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली असून, त्याची सुरूवात सिद्धविनायकाच्या दर्शनाने केली आहे
देव धर्माकडे वळाली राष्ट्रवादी
मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदारांनी एकत्रित सिद्धविनायकाचे दर्शन घेतले. यापूर्वी रविवारी अजित पवार यांनी पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखीचे बारामतीत स्वागत करत पारंपारिक वेषात वारीत सहभाग घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळात काम करताना अजित पवार यांनी त्यांच्या धार्मिकतेचे हे असे सार्वजनिक प्रदर्शन कधीच केलेले पाहायला मिळाले नव्हते असे पक्षातील अनेकांनी म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर अजित पवारांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी भरघोस निधीची तरतूद करत प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दरम्यान अजित पवार यांच्यामध्ये हे बदल लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या झालेल्या पराभवानंतर पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटण्याची भीती
दरम्यान उद्या राज्यातील 11 जगांवर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 11 जागांसाठी 13 अर्ज आल्याने निवडणूक लागली आहे. अशात महाविकास आघाडीला काही मतांची गरज पडणार आहे. अशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार क्रॉस व्होटिंग करतील असा दावा महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हे आरोप फेटाळले आहेत.
“उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन ते चार आमदार क्रॉस व्होट करू शकतात, म्हणूनच अजित पवार अशा देवदर्शनाच्या युक्त्या वापरत आहेत. पण परमेश्वर पापी लोकांना मदत करत नाही,” अशा शब्दात संजय राऊत यांनी पवारांवर टीका केली आहे.
रणनीतीकाराची नेमणूक
लोकसभेसारखी विधानसभेमध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अजित पवारांनी एका नव्या रणनीतीकाराची नेमणूक केली आहे. विधानसभेला चांगले यश मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अजित पवार गटाने नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून नेमणूक केली आहे. अरोरा हे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीला उपस्थित होते.
नरेश अरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक आहेत. याआधी त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. राजस्थान, कर्नाटकसह इतर काही राज्यांत त्यांनी काँग्रेसच्या प्रचार व्यवस्थापनाचं काम पाहिलं आहे. त्यांच्या या क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता अजित पवार गटाने निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांना निवडलं आहे.


