मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ सुरु आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांनी काल बैठकीला न आल्यामुळे विरोधकांवर टीका केली आहे. त्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधीपक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपली भूमिका काय? विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे, अमित साटम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गोंधळामुळं सभागृहाच कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली होती.
याच वादावरून महायुतीतील सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. आमदार अमित साटम आणि आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कुणाच्या सांगण्यावरून ‘बहिष्कार’ टाकल्याचा सवाल उपस्थित केला. यावेळी महायुतीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीनवेळा सभागृह तहकूब करण्याची वेळ आली.



