मुंबई: महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार निवडून आले. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, भावना गवळी यांच्यासह महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. विजयानंतर महायुतीच्या आमदारांनी जल्लोष केला. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर टीका केली. लोकसभेला आलेली सूज, आता उतरु लागली, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.
लोकसभेला आलेली सूज, आता उतरु लागली, एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
आज महायुतीचा मोठा विजय मिळाला आहे. महायुती 9 जागा जिंकणार, असा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता. सर्व मतदारांचे, आमच्या आमदारांचे मनापासून आभार मानतो. इतर आमदारांनी आम्हाला मदत केली, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व जागा जिंकून महायुतीची चांगली सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटिव्ह पसरवला, लोकांना फसवून मतं घेतली होती. ती सूज आलेली, आता उतरु लागली आहे. महायुतीचा विजय हा त्याचं एक ट्रेलर आहे. सुरुवात चांगली झाली, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता कामाला, विकासाला आणि कल्याणकारी योजना केल्या.. त्या सर्वांना मदत करेल. येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं, सर्वसामन्यांचं सरकार येईल, असे शिंदे म्हणाले.
आजचे अधिवेशन हे या टर्मचे शेवटचं अधिवेशन होतं. दोन वर्षांत महायुतीने केलेले काम, दोन वर्षातील काम.. मविआचं अडीच वर्षांचं काम पाहिले.. आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम केलेय, असे शिंदे म्हणाले. आमच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. विरोधीपक्षनेत्यांचेही अभिनंदन करतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.



