मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा डंका पाहायला मिळाला. महायुतीने 9 उमेदवार रिंगणात उतरवले होते. या 9 पैकी 9 उमेदवारांनी विजय मिळवलाय. यामध्ये भाजपच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसची तब्बल 8 मतं या निवडणुकीत फुटले आहेत.
शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महायुतीतील आमदारांची मतं किंवा अपक्ष आमदारांची मतं आपल्याकडे वळवण्यात अपयश आले आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजीराव गर्जे यांच्यावर राष्ट्रवादीची कागदपत्रे चोरल्याचा आरोप होता. त्यावरही ते पहिल्यांदाच मीडियाशी बोलले आहेत. विजयानंतर शरद पवार यांना भेटण्याचा प्रश्न येत नाही. माझं सर्वस्व अजित पवार आहेत, असंही शिवाजीराव गर्जे यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांना भेटण्याचा प्रश्नच नाही, शिवाजीराव गर्जे गरजले
शिवाजीराव गर्जे काय काय म्हणाले, मी कागदपत्रे चोरली नाहीत. माझ्यावर दोन आमदार टीका करतात. परंतु त्यांनी समजून घ्यावं अजित पवार गटनेते होते. त्यामुळे मी त्यानाच कागदपत्र दिली कारण त्यांचा तो अधिकार होता. माझ्यावर सातत्याने दोन आमदार टिका करतात. त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यायला हवी उगाचच चुकीची चर्चा करत राहतात. माझ्या विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचं आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करत रहाणार आहे. विजयानंतर शरद पवार यांना भेटण्याचा प्रश्न येत नाही. माझं सर्वस्व अजित पवार आहेत, असंही शिवाजीराव गर्जे यांनी स्पष्ट केलं.



