
जालना: राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं अखेर साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल. यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डीडी यांनी दिली.
तर या वाघनखांना देशात आणण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मात्र राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. सोबतच आपण देखील ही वाघनखं बघण्यासाठी साताऱ्याला जाणार असल्याची देखील तयारी दाखवली आहे.
वाघनखं भारतात आणून राज्य सरकारने चांगलं काम केलं- मनोज जरांगे
राज्य सरकारने वाघनखं भारतात आणले हे अतिशय चांगलं काम केलंय, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच कौतुक केलंय. मी देखील वाघनखं पाहण्यासाठी जाईल अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना दिलीय. आमचा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास आहे. ते काय करायचं ते करतील. उद्याचे उपोषण होणारच, असं सांगत उद्याच्या उपोषणाला प्रशासन किंवा शासन भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार, असं होणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलय.


