स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काहीही संबंध राहिला नसल्याची घोषणा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. रविकांत तुपकर यांनी अनेकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ही कारावाई करण्यात आल्याचं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
https://x.com/Ravikanttupkar1/status/1815343928784159014
रविकांत तुपकर यांच्यावरील कारवाई संदर्भात बोलताना जालिंदर पाटील म्हणाले, “रविकांत तुपकर यांनी काही राजकीय बैठका आयोजित केल्या आहेत. मात्र, त्याबाबत संघटनेला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. गेल्या चार वर्षात एकाही ऊस परिषदेला रविकांत तुपकर उपस्थित राहिले नाहीत. संघटनेच्या एकाही कार्यकारिणीच्या बैठकीला ते हजर राहिले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकाही आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले नाहीत. आतापर्यंत चार वर्ष आम्ही वाट पाहिली. पण आता आम्ही वाट पाहू शकत नाहीत. आजपासून रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काहीही संबंध नाही”, असं जालिंदर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.



