
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन केले आहे. उद्या, 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन दोन समाज आमने-सामने आले असून त्यावरून रोज जोरदार राजकारण सुरू आहे.
परिणामी, समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी ही यात्रा वंचितकडून आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रण देत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, खा. अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आ. पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेय. तर उद्या सुरू होणाऱ्या या यात्रेत नेमकं कोण कोणे नेते उपस्थित राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजकीय नेत्यांना सामील होण्याचं आवाहन
प्रकाश आंबेडकरांच्या या पत्रावर शरद पवार काय निर्णय घाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेत. अशातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. तर या पत्रामुळे शरद पवार कोंडीत सापडल्याचं दिसून येत आहे. शरद पवार आंबेडकरांनी आयोजित केलेल्या यात्रेत सहभागी झाले तर मराठा समाज पवारांवर नाराज होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये सहभागी नाही झाले तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे.


