लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून अनेक दिग्गज नेते आता प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर आगामी निवडणुकीत या पक्षाचा नव्याने कस लगाणार आहे. परिणामी प्रत्येक पक्षाने आता मतदारसंघनिहाय तयारी सुरू केली आहे.
अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षांनी मोठा दावा केला आहे. यात ते म्हणाले आहेत की, अजित दादाकडे गेलेल्यांची इच्छा असली तरी ते परत येऊ शकणार नाहीत. कारण अजित दादा हे दादाच आहेत. आम्ही गेले अनेक वर्ष सोबत काम केले आहे. त्यामुळे जातो म्हटलं तरी दादा कुणाला जाण्याची परवानगी देणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, हिंगोलीच्या वसमत विधानसभेचे आमदार राजेश नवघरे हे परत शरद पवार यांच्या पक्षात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहे. यावर भाष्य करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी हे वक्तव्य केले असून या बाबत मला कुठलाही निरोप नसल्याचे ही त्यांनी सांगितलय.


