आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी भागातील रस्त्यांची पालिका अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे वाट लागली असून दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे या भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. खराडी परिसरात सातव वस्ती परिसरात एका खासगी संस्थेच्या शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरच रस्त्यातच भला मोठा खड्डा पडून या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दीड महिन्यापूर्वी धानोरी लोहगाव मार्गावरील पोरवाल रोड परिसरात स्कूल वाहनाचा अपघात होऊन अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या अपघाताची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये निर्माण झाली आहे. यावर पालिका अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने हे अधिकारी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
लॅंगस्टन सोसायटी परिसरात पडलेल्या पावसामुळे पालिकेकडून बनविण्यात आलेले रस्तेच उखडून गेल्याने रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न परिसरातील नागरिकांना सतावत आहे. हा मार्ग वाहनचालकांना रात्रीच्या सुमारास अपघाताचे निमंत्रण देत आहे. खराडी गावठाण परिसरातदेखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रस्त्यांना बसविण्यात आलेले गट्टू उखडून गेले आहेत. पंढरीनगर भागातील सोसायटीमधील रहिवाशांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या पहिल्या मुसळधार पावसामुळे आपलं घर सोसायटी आणि तुळजाभवानीनगर भागातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरून नागरिकांच्या घरातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे संसार यामुळे उघड्यावर आले होते.




