पुणे : पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट इतकी आहे. खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अचानक परिसरात पाण्याची वाढ झाल्याने महिला, रुग्ण आणि नवजात बालकांचे हाल झाले आहेत. काहींनी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांवरच टीका केली आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणत होत असल्याने नांदेड, शिवणे पुलावर दोरखंड बांधून रस्ता बंद करण्यात आला. पुलावरून कोणीही ये-जा करू नये यासाठी पीएमआरडीए प्राधिकरणामार्फत अग्निशमन बंदोबस्त लावण्यात आला आहे. शांतीनगर येथील रहिवाशी इमारतीमध्ये अडकलेल्या एकूण सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अग्निशमन अधिकारी व जवान बारकाईने लक्ष्य ठेऊन आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेञामध्ये पूर येणे, दरड कोसळणे, झाडपडी अशा घटना घडल्यास पीएमआरडीएचा अग्निशमन सेवा विभाग सेवा देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज आहे.




