मुंबई : ठाणे शहरातील ठाकरे गटातील युवा सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेना (शिंदे गटात) मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं. राज्यात मागील अडीच वर्षात सर्व क्षेत्रात विकास कामांचा धडाका सुरू आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यानंतर सध्या राज्यात लाडक्या बहिणीची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, यामुळं विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठला असल्याची टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे.
सावत्र भावाच्या पोटात दुखू लागले
एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या राज्यात मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेची सर्वत्र चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात गाव-खेड्यात माता-भगिनी अर्ज दाखल करत आहे. या गर्दीचं चित्र विरोधकांना दिसत आहे. मात्र, लाडका बहीण योजनेमुळं सावत्र लाडक्या भावाच्या पोटात दुखू लागले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना आणली, तेव्हा लाडकी बहीण आहे, मग लाडका भाऊ का नको? असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून आम्ही लाडका भाऊ योजना आणली. शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली. त्यांच्या सरकारने काही केलं नव्हतं. परंतु आम्ही योजना आणल्यामुळं विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली आहे.


