मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिनेच बाकी आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली. यात मनसे आघाडीवर असल्याचं दिसत आहे. विधानसभेसाठी मनसेनं दोन उमेदवारांची घोषणा केली. शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेनं पत्रक प्रसिद्ध केलं.
शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर मैदानात : राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडं पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.


