अनिल देशमुख यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांवर सुरु असणारी आरोपांची मालिका काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. नागपूरच्या सावनेरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना उत्तरही दिलं तरीही अनिल देशमुख यांनी आरोप करायचं थांबवलेलं नाही. परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झालं होतं असा आरोप आता अनिल देशमुख  यांनी केला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

 

चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा खरा आहे असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख पुढे म्हणाले, चांदीवाल समितीचाअहवाल आल्यानंतर काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्याला जबाबदार देखील त्यांचाच पक्ष होता. त्यामुळे चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही.

 

त्यानंतर मागची दोन वर्ष हाच चांदीवाल आयोगाचा अहवाल त्यांच्या सरकारकडे पडून होता. ११ महिने चौकशी आणि चौदाशे पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जाहीर करावा, अशी माझी मागणी होती. त्यासाठी अनेकदा मी त्या आशयाचे पत्र देखील पाठवलं असं अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख यांनी जे आरोप केले त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तर दिलं.