
कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर समरजीत घाटगे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना तशी ऑफर देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामुळे कागल विधानसभेचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी वाढू शकते. परंतु, मला विधानसभा निवडणुकीत कोण उभे राहील, याची चिंता नाही, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते सोमवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कागलमध्ये कोण जिंकणार, हे जनता ठरवेल. 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झालेला आहे. माझ्यासमोर कोण उभे राहणार, याची मी चिंता करत नाही. तिरंगी-चौरंगी कशीही लढत होऊ दे, मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार, असे हसन मुश्रीफ यांनी ठणकावून सांगितले.
संजय घाटगेंना मी कधीही पैसे दिले नाहीत: हसन मुश्रीफ
कागल विधानसभेची लढाई सोपी करण्यासाठी हसन मुश्रीफ संजय घाटगे यांना रिंगणात उतरायला सांगतात, त्यासाठी ते घाटगे यांना पैसे देतात, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना हसन मुश्रीफ यांनी म्हटले की, आईशपथ घेऊन सांगतो मी कधीही संजयबाबा घाटगे यांना विधानसभेला उभा राहण्यासाठी पैसे दिले नाहीत. निवडणूक तिरंगी करण्यासाठी मी संजयबाबा यांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण यात तथ्य नाही असा खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजयबाबा घाटगे यांनी आपण यावेळी मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर पैसे देण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, मी कधीही संजयबाबा घाटगे यांना पैसे दिले नाहीत असं मुश्रीफ म्हणाले. इतकंच नाही तर तुमच्या थर्मामीटरमध्ये मी बसत असेल तर यंदा मी पुन्हा लग्नाला उभा राहणार आहे, माझ्यावर अक्षता टाका असं म्हणत मुश्रीफ यांनी प्रचाराचा एकप्रकारे शुभारंभ केला.



