हिंगोली : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये दौरे, बैठका, कामाचा आढावा राजकीय नेतेमंडळी घेत आहेत. असं असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सोमवारी हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता. राज्यातील दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू आक्रमक झाले होते. यावेळी “मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, समुद्रात उचलून टाकू”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. दरम्यान, या विधानावर आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

आम्ही आता आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. प्रहारचा एक आमदार बच्चू कडू आणि दुसरा राजकुमार हे आहेत. आता येणाऱ्या निवडणुकीत आमचे जर २० आमदार निवडून आले आणि शेतकरी, मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ होता, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं.