
अमरावती : लाडकी बहीण योजनेबाबत केलेलं वक्तव्य हे गंभीरतेने केलं नव्हतं, गमतीमध्ये आणि हसत हसत केलेलं होतं, ते वक्तव्य भावा-बहिणीमधील नात्यामध्ये केलेलं होतं असं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यांनी दिलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही, यावरून कुणीही राजकारण करू नये असंही ते म्हणाले. आम्हाला जर मतं मिळाली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे देण्यात येणारे 1500 रुपये काढून घेतले जातील असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केलं होतं. त्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.
रवी राणा म्हणाले की, त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असं वक्तव्य केलं नव्हतं. भाऊ हा बहिणीचं कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. काँग्रेसने खोटं बोलून मतदान घेतलं, पण हे सरकार तसं करणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे असं रवी राणा म्हणाले.
