
धुळे : राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा धुळे शहरात आली असताना गुप्तचर वार्ता विभागाने दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला विविध विभागांचे अधिकारी भेटत असतात. त्यानुसार मला मिळालेल्या माहितीप्रमाणे माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र माझ्या माय माऊल्यांची राखी माझ्या हाताला आहे तोपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. मात्र या राज्यातल्या मायमाऊल्यांसाठी काम करत असताना माझा जीव गेला तर ते मी माझं भाग्य समजेल अशी भावनिक साद अजितदादांनी यावेळी उपस्थित महिलांना घातली.
