
पहिलवान रणजीत जाधव, दौलतराव इंगवले, श्रीनिवास डुबल आदी कुस्तीप्रेमींच्या शिष्टमंडळाने कराडमध्ये मंत्री मोहोळ यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावर सकारात्मकता दर्शवत आपण स्वतः लक्ष घालून खाशाबांना ‘पद्मविभूषण’साठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यामुळे भारताला ऑलिम्पिकमधील वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या यथोचित सन्मानाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या स्पर्धेत फ्री स्टाईल ५७ किलो वजनी गटातील कुस्ती जिंकून खाशाबा जाधव यांनी इतिहास रचला. कराड लगतच्या गोळेश्वरचे सुपुत्र पहिलवान खाशाबा दादासाहेब जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीवर मात करत ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घातली. परंतु, केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा आजवर उचित गौरव केला नसल्याची खंत आहे.



