बदलापूर : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या दोन्ही मुली अत्यंत कोवळ्या वयातल्या आहेत. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर मंगळवारी रस्त्यावर उतरले होते. लोकल सेवा बदलापूरकरांनी १० तास रोखून धरली होती. दरम्यान महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीने (MSCPCR) शाळा प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शाळेने आरोपीला कामावर रुजू करुन घेण्याआधी त्याची माहिती का घेतली नव्हती? असा सवाल या समितीने विचारला आहे. एवढंच नाही तर शाळेत सखी सावित्री समिती का नाही? असाही सवाल या समितीने केला आहे.

महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीने काय म्हटलं आहे?

“बदलापूरच्या नामांकित शाळेत घडलेली ही घटना अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. शाळेतील यंत्रणेचं हे अपयश आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. शाळेने ही घटना उघड होऊ दिली नाही. तसंच पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवण्यासाठी बारा तास लावले. त्यामुळे मुलींची वैद्यकीय चाचणी १० तास लांबली. तसंच रुग्णालयात या मुलींना स्तनदा मातांच्या कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांना दाखल करुन घेण्यासही नकार देण्यात आला होता.” असं महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

शाळेत कॅमेरे नाहीत, स्वच्छता कर्मचारी महिला प्रसाधानगृहात जाऊ शकतात

सुशीबेन शाह म्हणाल्या, मी शाळेला भेट दिली, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. तसंच सखी सावित्री समितीही नाही. पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिला प्रसाधनगृहात जाऊ दिलं जातं आहे. जो आरोपी आहे तो काँट्रॅक्टवर लागला होता. मात्र त्याची पार्श्वभूमी काय हे कुणीही जाणून घेतलं नाही. त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड ( Badlapur sexual assault ) आहे का ते पाहिलं गेलं नाही.